धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना दिला पाहिजे.सोबतच महिला व बालकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित सर्वसमावेशक महिला जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून पुजार बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना,महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, प्रभारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी किशोर गोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुजार म्हणाले की, सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचाराला आळा घालण्यासोबतच बालविवाह रोखण्याचे काम करण्यात येत आहे.पीडित महिला व बालकांचे समुपदेशन देखील करण्यात येते तसेच त्यांना वैद्यकीय मदत करून इतर सेवांचा लाभ देऊन त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्यात येते.बालकांचे संगोपनासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे.हुंडा प्रथा आणि कौटुंबिक हिंसाचार यासारख्या सामाजिक समस्यांबाबत कायदेशीर जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम होत असल्याचे पूजार यावेळी म्हणाले. यावेळी किशोर गोरे, देवदत्त गिरी यांनी अधिक माहिती दिली.