भूम (प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती समाजात मोठ्या उत्साहात साजरी होणे गरजेचे आहे. ही जयंती डीजे या तालावर नाही तर शिवरायांच्या विचारांच्या प्रेरणेवर साजरी करणे गरजेचे आहे. महापुरुषांना आपण जातीत वाटून घेतले आहे. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. अशोक पाटील यांनी केले. ते भूम पोलीस ठाण्याच्या वतीने  कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, प्रमुख पाहुणे अशोक सावळे, सचिन उकिरडे हे होते. यावेळी पुढे प्रा. पाटील म्हणाले की, शिवरायांचा जयजयकार फक्त जयंती पुरता करू नये. त्यांच्या विचारांचे अंजन डोळ्यात घालून जगणे गरजेचे आहे.शिवचरित्र वाचणे गरजेचे आहे. थोर पुरुषांचे दैवतीकरण करून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे कधीही शत्रू नव्हते. ते सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणारे होते. आज समाज ज्या मार्गाने चालला आहे तो समाज कदापिही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तसेच महामानवांना, संतांना मान्य नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार परदेशात पोहोचले. त्या ठिकाणी त्यांचे आचरण केले जाते. मात्र आपल्या देशामध्ये त्याचे आचरण होत नाही हे दुर्दैव आहे असे ते म्हणाल

यावेळी अरुण शाळू महाराज, दिलीप गाढवे, एस पी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष शिंदे, अंबादास वरवडे, ॲड अमरसिंह ढगे, ॲड पंडित ढगे, प्रा अरुण गाढवे, सोमनाथ गुंजाळ, वैजिनाथ गपाट यांच्यासह माजी सैनिक, शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, व्यावसायीक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. मोहन राठोड यांनी केले. तर आभार सहायक पोलिस निरीक्षक संजय झराड यांनी मानले.


 
Top