धाराशिव (प्रतिनिधी)- आश्रम शाळांमध्ये काम करणे मोठे कसरतीचे काम आहे. त्यामुळे आश्रमशाळांमध्ये नोकरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निकोप आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धांचे सतत आयोजन करून त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोलापूर अंतर्गत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे धाराशिव येथील श्री तुळजाभवानी स्टेडियमवर शनिवार, दि.21 फेब्रुवारी रोजी उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे, आदिवासी पारधी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, तालुका क्रीडा अधिकारी भैरूनाथ नाईकवाडी, सुधीर पवार,सरतापे, माळवे, गायकवाड, धुमाळ, कांबळे, बुरंगे, सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी दीप प्रज्वलन, क्रीडा ज्योत प्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण व आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर पहिला क्रिकेट सामना आश्रमशाळा सवतगव्हाण आणि प्रकल्प कार्यालय सोलापूर या संघात झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजापुरे यांनी केले. उदघाटन सोहळ्यास अधिकारी, कर्मचारी व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संघाचा स्पर्धेत सहभाग
क्रीडा स्पर्धेत तीन आश्रमशाळा आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व वसतिगृह यांचा एकत्रित असे चार संघ सहभागी झाले असून यात अधिकारी व कर्मचारी महिला, पुरुष खेळाडूंचा सहभाग असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोलापूरचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी दिली.

