धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूरचा कायापालट होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाची 438 कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. पुढील काळात जगभरातील पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांची तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे. जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून तुळजापूरचा लौकिक जगभरात वाढणार आहे. या लौकिकाला साजेसे भव्य आणि व्हीव्हीआयपी विश्रामगृहाला उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 16 कोटी 35 लाख रुपयांची मान्यताही मिळाली आहे. लवकरच 34 हजार चौरस फुटांचे भव्य आणि आधुनिक व्हीव्हीआयपी विश्रामगृह तुळजापुरात उभारले जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले विश्रामगृह 59 वर्ष जुने असल्यामुळे प्रशस्त आणि आधुनिक इमारतीची गरज होती, त्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे येथे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक व व्हीआयपी मान्यवर दर्शनासाठी येतात. त्यामुळे सद्यःस्थितीत ते अपुरे पडत आहे. त्याचबरोबर विश्रामगृहाची इमारत जुनी झाली आहे. भाविकांचा वाढता ओघ पाहता एका प्रशस्त आणि आधुनिक इमारतीची आवश्यकता असल्याने आपण त्यादृष्टीने प्रयत्न केले आणि नवीन विश्रामगृहाच्या बांधकामाला आता उच्च स्तरीय समितने मंजुरी दिली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे.
तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा भव्य शासकीय विश्रामगृह इमारतीच्या बांधकामासाठी 16 कोटी 35 लाख रुपयांची मंजुरी मिळाली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. ज्या ठिकाणी ही नवीन वास्तू उभी राहणार आहे, त्या ठिकाणी सध्या तीन जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती आहेत. या इमारती सध्या वापराविना पडून असून, नवीन प्रकल्पासाठी त्या पाडण्यात येणार आहेत. ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची (सिटी सर्व्हे क्र. 902) असून एकूण क्षेत्रफळ 1,18,920 चौ.फूट इतके विशाल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत हे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.
असे असेल नवीन व्हीव्हीआयपी विश्रामगृह
प्रस्तावित विश्रामगृहाची इमारत ही जी प्लस टू अर्थात तळमजला अधिक दोन मजले अशा स्वरूपाची असून ती पूर्णपणे आरसीसी फ्रेम स्ट्रक्चरमध्ये असेल. या इमारतीचे एकूण जोते क्षेत्रफळ 3,168 चौ.मी. (34,100 चौ.फूट) इतके भव्य आहे. विशेष म्हणजे, वास्तुशास्त्रज्ञांकडून या इमारतीचे नकाशे तयार करण्यात आले असून त्याला उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञांची तत्वतः मान्यताही मिळाली आहे. त्यानुसार तळमजल्यावर 4 व्ही.आय.पी. सूट, मीटिंग हॉल, डायनिंग, किचन, चालक रूम तर पहिल्या मजल्यावर 2 व्ही.व्ही.आय.पी. सूट, 2 सेमी व्ही.आय.पी. सूट आणि दुसऱ्या मजल्यावर 2 व्ही.व्ही.आय.पी. सूट, 2 सेमी व्ही.आय.पी. सूटच्या बांधकामास मंजुरी मिळाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
