कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध मंडळांनी डीजे-मुक्त, पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून आदर्श निर्माण केला. या अनुकरणीय उपक्रमांची दखल घेत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने संबंधित मंडळांचा ‌‘शिवसन्मान‌’ सोहळा उत्साहात पार पडला.

व्याख्यानमाला, संस्कृतीप्रधान कार्यक्रम, समाजप्रबोधनपर उपक्रम आणि अनुशासनबद्ध आयोजनातून शिवजयंती साजरी करून शहराचा नावलौकिक उंचावणाऱ्या मंडळांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ. सुनंदाताई कापसे यांच्या हस्ते झाले.

यावेळी यश मेडिकल फाउंडेशनचे डॉ. संदीप तांबारे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंजि. प्रकाश धस, प्रियदर्शिनी बँकेचे चेअरमन श्रीधर भवर, क्रीडा महर्षी लक्ष्मण मोहिते, पोलीस उपनिरीक्षक डी. जे. घाडगे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक बोराडे ताई, तालुकाध्यक्ष डॉ. वर्षा जाधव, प्रा. प्रतिभा भवर, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव प्रा. संजय सावंत, तालुकाध्यक्ष प्रा. जगदीश गवळी, सचिव अरविंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिस्तबद्ध व संस्कृतीप्रधान पद्धतीने शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवसेवा तालीम संघ कळंब, व्यापारी असोसिएशन मार्केट यार्ड कळंब, स्वराज्य ग्रुप तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन आयोजित करणाऱ्या फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशन, कळंब यांचा ‌‘शिवसन्मान‌’ देऊन गौरव करण्यात आला.

याचवेळी चिमुकल्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक शिवक्रांती गायकवाड व रूपाली कुपकर, द्वितीय अमृता शिंदे, तृतीय नेहा कांबळे तर उत्तेजनार्थ दीक्षा राऊत यांनी यश मिळविले.

सोहळ्याची सांगता सुप्रसिद्ध भारुडकार प्रभाकर कुटे महाराज यांच्या सामाजिक प्रबोधनपर भारुड कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दत्ता कवडे, ॲड. अशोक चोंदे, ॲड. शिवराज मराठे, जावेद भाई सौदागर, सुजित लिमकर, संतोष कदम, बालाजी माळी, महेश कोळपे, अमोल पवार, महादेव सुतार आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

 
Top