धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर नाईचाकुर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस (आय) महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विरोधकांचा समाचार घेतला आणि विकासाच्या मुद्द्यावर आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले.
उमेदवारांच्या विजयासाठी एकजूट कवठा जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री. महेश माणिकराव देशमुख आणि नाईचाकुर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. सुगलाबाई वामन मदने यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही उमेदवारांच्या कार्याचा गौरव करत, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित आणि जनसंपर्क असलेल्या नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
महत्त्वाचे मुद्दे आणि मार्गदर्शन: सभेला संबोधित करताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खालील विषयांवर भाष्य केले शेतीमालाला हमीभाव, सिंचन व्यवस्था आणि ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य महिला सक्षमीकरण: महिलांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष जनतेच्या विश्वासावर ठाम असून, न्याय आणि लोकहितासाठी आमची लढाई सातत्याने सुरू राहील.
उमेदवारांची ग्वाही यावेळी उमेदवार महेश देशमुख व सुगलाबाई मदने यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले की, “आम्ही केवळ सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी निवडणूक लढवत आहोत. पारदर्शक कारभार आणि प्रामाणिक सेवा हीच आमची ओळख असेल.“या सभेला नाईचाकुर परिसरातील शिवसैनिक, काँग्रेसचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मशाल आणि हाताच्या चिन्हाचा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सभेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
