भूम (प्रतिनिधी)- भूम ते परांडा रोडवर स्कुल बस व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका 13 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती कळताच भूम पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी ती स्कुल बस ताब्यात घेतली असून चालकालाही ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये राजू अनिल लोखंडे या इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, भूम शहरातील बाणगंगा हायस्कुल येथील स्कुल बस शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी सोडण्यासाठी शहरातील परंडा रोडने निघाली होती. ही स्कूल बस शहरातील परंडा रोड लगत असणाऱ्या बाळासाहेब क्षीरसागर यांच्या पेट्रोल पंपा नजीक आली होती. त्यावेळी त्या गाडीसमोर राजू अनिल लोखंडे व त्याचा मित्र ध्रुव भारत चाकवते हे एम एच 25 ए टी 0713 या क्रमांकाच्या दुचाकीवरून पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी जात होते. पेट्रोल पंपाकडे जाण्याच्या 50 फूट अलीकडे या स्कूल बसने या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी व त्यावरील दोन्ही मुले खाली पडली. यामध्ये राजू अनिल लोखंडे यांच्या डोक्यावरून गाडीचे पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला. तर ध्रुव भारत चाकवते हा किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर स्कूलबसचा चालक दत्ता जालिंदर देवकते यास भूम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवकते हा चालवत असलेली गाडी नवी कोरी आहे. त्या गाडीची अद्याप पर्यंत पासिंग देखील झालेली नाही.
