भुम (प्रतिनिधी)- तालुक्यातील हाडोंग्री शिवारामध्ये अघोरी काळ्या जादूचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शेतमालक अमेय बाळासाहेब पाटील (हाडोंग्रीकर) यांच्या शेतामध्ये हा प्रकार उघडकीस आला.

अमेय पाटील सकाळी शेतात गेले असता लिंबाच्या झाडाला एका कुत्र्याला उलटे टांगलेले दिसले. त्या मयत कुत्र्याच्या डोक्याला गाय, बैल किंवा म्हशीच्या तोंडाचा सांगाडा बांधलेला होता. कुत्र्याच्या गळ्यात कवड्यांची माळ घातलेली होती. त्याखाली हिरवा कपडा अंथरलेला असून त्यावर दगड मांडलेले व हळदी-कुंकू वाहण्यात आले होते. तसेच शेजारी एक परडी जाळलेली दिसून आली. त्यासोबतच तांदूळ, बांगड्या, विड्याचे पान देखील त्या ठिकाणी आढळून आले. हा प्रकार पाहून अमेय पाटील यांनी तात्काळ भूम पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या अघोरी किंवा काळ्या जादूच्या कृत्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. विज्ञानानुसार नैसर्गिक घटनांवर मानवी कर्मकांडांचा कोणताही परिणाम होत नाही. आजार, अपयश किंवा संकटे ही नैसर्गिक, सामाजिक व आर्थिक कारणांमुळे घडतात, अघोरी कृत्यांमुळे नाहीत.विज्ञाननिष्ठ विचारसरणी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार अशा प्रकारांना कायद्याने गुन्हा मानले जाते.

या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भूम पोलीस करीत आहेत. आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांनी अशा अंधश्रद्धांना बळी न पडता विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.

 
Top