तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापुरात माघ पौर्णिमा रविवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी पारंपरिक भक्तिभावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माघ (नव्याची) पौर्णिमा आणि श्री संत रोहिदास जयंतीचे औचित्य एकत्र आल्याने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांचा अक्षरशः महापूर उसळला होता. दिवसभर मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.

राज्याच्या विविध भागांतून, विशेषतः श्री संत रोहिदास जयंतीनिमित्त मोची समाजासह विविध समाजातील भाविकांनी तुळजापुरात येत श्री तुळजाभवानी मातेचा कुलधर्म-कुलाचार पार पाडला. माघवारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनीही देवीदर्शन घेत परिसरात खरेदी करून धार्मिक विधी पूर्ण केले. धर्मदर्शन, सर्वसाधारण दर्शन व इतर रांगांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

माघ पौर्णिमा ही तुळजापुरात नव्याची पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यानिमित्त शेतकरी वर्गाने आपल्या शेतातील पहिली ज्वारीची कणसे देवीदारी अर्पण करून परंपरेचे पालन केले. सायंकाळी व रात्री श्री तुळजाभवानी मंदिर प्रांगणात छबिना काढण्यात आला. त्यानंतर महंत बापूजी बुवा गुरु तुकोजी बुवा यांच्या हस्ते प्रक्षाळ पूजा करण्यात आली. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर रात्री मंदिर बंद करण्यात आले. माघ पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापुरात भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.

 
Top