भूम (प्रतिनिधी)- राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेपर्यंत, विशेषतः समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प असून, 2047 पर्यंत धाराशिव जिल्हा विकसित जिल्हा म्हणून नावारूपाला येणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर ईट सर्कलसह परिसराचाही सर्वांगीण विकास केला जाईल, असे आश्वासन त्यांनी ईट येथे झालेल्या भाजपच्या भव्य प्रचारसभेत दिले.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने लखपती दीदी योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना पाच लाख रुपयांपर्यंत कोणताही व्यवसाय किंवा रोजगार सुरू करण्यासाठी बिनव्याजी अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 55 योजना, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 44 योजना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते विकास योजना आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासकामे म्हणजे विकासाची “चार चाकी गाडी” असून ती वेगाने पुढे जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

भूम तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी एकूण तीन तर पंचायत समितीसाठी सहा उमेदवार रिंगणात असल्याचे सांगण्यात आले. इट जिल्हा परिषद गटातून वर्षा गीते, सुक्ता सर्कलमधून धनश्री हापटे आणि पाथरूड गटातून सिताराम वनवे हे उमेदवार विकासाची सुसाट गाडी असल्याचे सांगत, पंचायत समितीचे विजयी उमेदवार हे या गाडीचे “पॅसेंजर” असतील, असे वक्तव्य करण्यात आले. इट, सुक्ता व पाथरूड परिसराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल, असे आश्वासनही मंत्री महोदयांनी दिले.

मात्र, याचवेळी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत असल्याचे चित्र सभेनंतर चर्चेत आले आहे. भूम तालुक्यात एकूण पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गण असताना मंत्री महोदयांच्या भाषणात फक्त तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणनांचाच उल्लेख व विकासाचा शब्द देण्यात आला. उर्वरित वालवड, माणकेश्वरसह इतर गट व गणांच्या विकासाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उरलेले गट व गण वाऱ्यावर सोडायचे का, अशी भावना काही कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.

याशिवाय, ज्या तीन जिल्हा परिषद गटांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, त्यापैकी दोन उमेदवार आयत्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करून थेट तिकीटधारक झाले आहेत. त्या त्या गटांतील जुने, निष्ठावंत व वरिष्ठ भाजप कार्यकर्ते यांना विश्वासात न घेतल्याची नाराजी दबक्या आवाजात व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर इट येथे भव्य सभा आयोजित करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सभेसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे राज्य भाजपा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब शिरसागर भूम तालुका अधक्ष संतोष सुपेकर संजय कोडगे समरजीतसिंग ठाकूर जाहीर चौधरी ज्ञानेश्वर गीते पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top