तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर नगर परिषदेची नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह पहिली सर्वसाधारण सभा सोमवार दि. 2 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तब्बल तीन तास चाललेल्या या सभेत एकूण 87 विषयांवर चर्चा करण्यात आली. काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. तर उर्वरित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे ही पहिलीच सभा खेळीमेळीच्या व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली.

सभेत भवानी रोडवर दुचाकी वाहतूक बंद करून लोखंडी गेट स्थलांतर, कुंभारवाडा येथील भवानी तीर्थकुंड परिसरात गाळे विकसित करणे, नळदुर्ग रोड पाईपलाईन लिलाव प्रक्रिया, नळदुर्ग रोडवरील न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बसवणे, मंगळवार पेठेतील खंडोबा मंदिरासमोरील खोली जागेत गाळे उभारणे, पांडुरंग नगर व गवते प्लॉटिंगमध्ये खोली जागा विकसित करणे, तुळजापूर खुर्द येथे सार्वजनिक शौचालय बांधणे, भवानी रोडवरील नाल्यांची दुरुस्ती व नवीन नाली बांधकाम, कचरा डेपो स्थलांतर या मुद्द्यांवर चर्चा झाली. 

याशिवाय छत्रपती शिवाजी चौक ते दीपक चौक (घाटशिर रोड) वाहनतळ प्रवेश व पोलीस संकुल ते शिवाजी चौक वाहने बाहेर काढणे अशी वाहतूक व्यवस्था करणे, श्री तुळजाभवानी मंदिरासमोर आरो प्लांट उभारून उत्पन्नवाढ, मंगळवार पेठ रस्ता रुंदीकरण, प्रभाग क्र. 11 मधील जुन्या व्यायामशाळेचे नूतनीकरण, मुख्याधिकारी कक्ष नूतनीकरण, घाटशिळ रोड स्मशानभूमी येथे संरक्षण भिंत व पाणी टाकी, छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण आदी विषयांचा समावेश होता. नगरपरिषदेच्या मालमत्तांचे चतुर्थ वार्षिक फेरमूल्यांकन करून कर आकारणी, नगररचना अधिनियम 1966 नुसार आरक्षण भूसंपादन, बांधकाम परवाना सुरक्षा अनामत रक्कम वाढ, गुंठेवारी मुदतवाढ, मोकाट जनावरे, श्वान व वराह पकडून निर्बिजीकरण व लसीकरण यावरही चर्चा झाली.

या सभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सूचना मांडल्या. गाळ्यांवरील फिक्स डिपॉझिट कायम ठेवणे, शहरातील आरक्षित जागांची मोजणी करून नोंद घेणे अशा सूचना करण्यात आल्या. सभेचे कामकाज सभा अधीक्षक प्रफुल्लता बरूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिले. 

 
Top