धाराशिव (प्रतिनिधी)- कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे साधन बनु शकते असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चॅट जीपीटीच्या सहाय्याने शिक्षक व व्यावसायिकांचे सक्षमीकरण : प्रात्यक्षिक व सहभागात्मक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना गावडे म्हणाले की, एआयच्या सहाय्याने मानवी क्षमता व उत्पादकता अनेक पटींनी वाढविण्यासाठी मदत होऊ शकते. पण तरीही मनुष्य बळाची गुणवत्ता विकसित देशांतील मानवी बळापेक्षा वेगळी असेल. नविन प्रणालीमुळे आयुष्यभर शिक्षण घेत रहाण्याची नविन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती म्हणाल्या की, एआयचा वापर सर्वांनी सुरक्षित पद्धतीने तसेच त्याच्या माध्यमातून जी माहिती मिळते ती काळजीपूर्वक पाहून बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. यावेळी प्राचार्य डॉ.रत्नदीप देशमुख, प्राचार्य डॉ. संदीप देशमुख, चेतन टाकसाळे, डॉ. धर्मराज वीर, डॉ. सुभाष चव्हाण यांचेही मार्गदर्शन झाले.या कार्यशाळेची समन्वयक म्हणून ग्रंथपाल डॉ मदनसिंग गोलवाल यांनी काम पाहिले.
