तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हा आरोग्य विभागाचे सुरवायझर तानाजी क्षिरसागर यांना सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन 2024 - 25 या वर्षीचा राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार“ जाहीर करण्यात आला असुन हा पुरस्कार प्राप्त करणारे तानाजी क्षिरसागर हे संपुर्ण महाराष्ट्रातुन एकमेवर आरोग्य सुपरवायझर आहेत. हा पुरस्कार महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, एक लाख रूपये असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो.
तानाजी क्षिरसागर यांनी आपले आरोग्य विषयक काम व्यवस्थीत सांभाळुन त्यांनी अतिरीक्त आरोग्य विषयक कामकाज उत्कृष्टरित्या पार पाडले आहे. विविध आरोग्य विषयक कामकाजामध्ये आरोग्य शिबीरे, कुटुंब कल्याण, क्षयरोग, कुष्ठरोग, अंधत्व, हत्तीरोग मोहिम, पल्स पोलीओ मोहिम, कोरोना काळातील उल्लेखनिय काम, स्वच्छता अभियान, वारकरी पायी पालखी नियोजन, यात्रा महोस्तव, वृक्षारोपण, बगीचा व इतर कार्यक्रमात उल्लेखनिय कामे केलेले आहेत. राज्यस्तरीय हा पुरस्कार 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्षिरसागर यांना देण्यात येणार आहे.
त्यांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत धाराशिव जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत आरोग्य विभाग, जि. प. धाराशिव मार्फत तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खडी फोड मजुर, विटभट्टी मजुर, खनिज काम करणारे मजुर व इतर मजुरांसाठी आरोग्य विषयक कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे आरोग्य विषयक लागणाऱ्या साहित्यासाठी मुंबई येऊन सी.एस.आर. फुडातुन आरोग्य उपकेंद्र बारूळ ता. तुळजापूर येथे रू. 4,65,000/- व प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी ता. धाराशिव येथे रू. 6,21,114/- इतकी रक्कम फंडातुन मिळवुन दिल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय, बारूळ ता. तुळजापूर व प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी यांच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
तसेच आर.आर.पाटील सुंदर गाव योजना अंतर्गत सहभागी झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या तपासणी समितीचे सदस्य म्हणुन निवड करण्यात आली होती.
तानाजी क्षिरसागर यांनी नागपूर, पैठण, धाराशिव, सोलापूर छत्रपती संभाजीनगर येथे विविध आरोग्य विषयक प्रशिक्षण पुर्ण केल्याबद्दल त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.
त्यांनी ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबाच्या जीवनावर आधारीत पोळा ही कथा लिहिली आहे आरोग्य विभागातील उत्कृष्ठ कामा बाबत त्यांना सन 2006 मध्ये आगाऊ वेतनवाढ देऊन गौरव केला तसेच जिल्हा स्तरावरील पुरस्काराने सन 2023 - 24 व 2024-25 असे सतत दोन वर्ष प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यांनी स्वयंस्फुर्तीने राबविलेले कार्यक्रम हे जनमानसात फारच आकर्षक ठरले होते. कन्येच्या लग्न सोहळ्यात वृक्षा बाबत संवर्धन आणि जोपासनेसाठी जनजागृती केली होती. ते वृक्षारोपणाबाबत सातत्याने जनजागृतीचे काम करत आलेले आहेत.
तानाजी क्षिरसागर यांची राज्यांतर्गत अभ्यासदौऱ्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्या आदेशान्वये “राज्यांतर्गत सिंधुदुर्ग “या जिल्ह्यासाठी पाच दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी विशेष निवड करून सिंधुदुर्ग येथे पाठविण्यात आले होते. त्यांना मिळालेल्या “ वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार पुरस्कार“ या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचे जिल्हा व तालुकास्तरातील अनेक मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले असुन त्यांच्या सार्वजनिक कार्याबद्दल शुभेच्छ्या व्यक्त केल्या आहेत.
