तेर (प्रतिनिधी)- “समता वारी हा केवळ धार्मिक प्रवास नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. हा विचार दूरगामी समाजहिताचा असून तरुणांनी या वारीत सहभागी होत समतादूत बनावे,” असे प्रतिपादन समता वारीचे निमंत्रक, संत चोखामेळा चरित्र अभ्यासक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक सचिन पाटील यांनी केले.
तेर येथे चोखोबा वाणी दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना त्संयांनी ही माहिती दिली. चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा शुभारंभ रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथे, संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित अभिवादन सभेतून झाला. या सभेत सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संत विचारांचा जागर करण्यात आला.
भागवत धर्म व वारकरी परंपरेतील संतांनी सांगितलेल्या समता, मानवता व बंधुभाव या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. यंदा या वारीचे आठवे वर्ष असून, ही वारी महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांतून सुमारे १७५० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ही वारी मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, उमरगा, माकणी, औसा, तुळजापूर, धाराशिव, तेर, कसबे तडवळे, येरमाळा, भूम–पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, पैठण, जालना, सिंदखेडराजा, मेहुणाराजा, देऊळगाव राजा, संभाजीनगर, नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे व आळंदी या मार्गे येऊन देहूगाव येथे समाप्त होणार आहे. वारीदरम्यान संतांनी मांडलेल्या समता, बंधुता व मानवतेच्या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार असून, संत चोखामेळा महाराजांची उत्सवमूर्ती विशेष सजविलेल्या रथात विराजमान असणार आहे. शाळा, महाविद्यालये, वाड्या-वस्त्या, गावे व शहरे येथे जाऊन समाजप्रबोधन करण्यात येणार आहे.
आज समाजात वाढत चाललेली जातीय व धार्मिक दरी कमी व्हावी, माणसा-माणसातील नाते दृढ व्हावे आणि ‘जात, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व भारतीय आहोत’ हा विचार रुजावा, या उद्देशाने समता वारीचे आयोजन करण्यात येते. एकसंघ समाज हेच राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे, असा संदेश ही वारी देत आहे. यावेळी सचिन पाटील यांच्यासह अविनाश अभंगराव, महादेव ढेंबरे, डॉ. लक्ष्मण हेंबाडे, तात्यासाहेब येरमाळकर ,आशिष यादव, ॲड. रोहित मुंडे, कालिदास सदगर आदी समता वारी प्रतिनिधी उपस्थित होते. चोखोबावाणी दिनदर्शिकाचे तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात प्रकाशन करण्यात आले . यावेळी तेर येथील राहुल गायकवाड, सुनिल गायकवाड, नरहरी बडवे आदी उपस्थित होते.
