धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात आज बुधवार दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सकाळी ठीक 9.26 वाजता आणि त्यानंतर 9.36 वाजता कळंब, धाराशिव, तुळजापूर तसेच परिसरातील इतर भागांमध्ये भूगर्भातून आलेल्या गूढ व जोरदार आवाजांचे धक्के नागरिकांना जाणवले. या धक्क्यांची तीव्रता इतकी होती की, अनेक घरांच्या भिंती जोरात हलल्या, तर खिडक्या व दारे थरथरली.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर आले. काही वेळासाठी गावोगावी आणि शहरातील वसाहतींमध्ये लोक एकमेकांकडे धाव घेत चौकशी करू लागले. काही नागरिकांनी हा अनुभव भूकंपासारखा असल्याचे सांगितले, तर काहींनी जमिनीखालून मोठा स्फोट झाल्यासारखा प्रचंड आवाज ऐकू आल्याचे नमूद केले. काही सेकंदांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या आवाजांमागे भूगर्भातील हालचाल, नैसर्गिक दाबातील अचानक बदल, किंवा इतर तांत्रिक कारणे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध स्तरांवरून या घटनेचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.सोशल मीडियावर मात्र या घटनेनंतर भूकंप झाल्याचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अधिकृत यंत्रणांकडून अद्याप भूकंपाबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही
आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.10 ते 10.00 मिनिट या सुमारास कळंब - ढोकी जिल्हा धाराशिव परिसरात भूगर्भातून गुढ आवाज होऊन भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. सबब माहितीची जिल्हा प्रशासनाने त्वरित नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली असता त्यांचेकडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार,या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की,नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये.
जिल्हाधिकारी धाराशिव.