धाराशिव (प्रतिनिधी)- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात आर्ट ऑफ लिव्हिंग व्याख्याते स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी "शारीरिक व मानसिक आरोग्य" या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षस्थान भुषविले.
मत्सर सोडा, प्रगती साधा स्वामीजींनी आपल्या मार्गदर्शनात मानवी स्वभावावर मार्मिक भाष्य केले. ते म्हणाले की, "आज काही माणसांना दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. दुसऱ्याच्या प्रगतीत अडथळे आणण्याची वृत्ती ही विघातक आहे. प्रसन्न जीवन जगण्यासाठी आपल्या भावना शुद्ध असणे आवश्यक आहे. आपण जितके विचार उच्च ठेवू, तेवढीच आपली प्रगती होण्याची दाट शक्यता असते. बुद्धी विशाल आहे, तिचा वापर सकारात्मकतेसाठी करा."
यशाचा राजमार्ग यशस्वी लोकांच्या जीवनशैलीचा दाखला देत स्वामी ब्रह्मचैतन्य म्हणाले की, जगातील सर्व यशस्वी लोक प्राणायाम आणि ध्यानाचा आधार घेतात. सुदर्शन क्रियेमुळे आत्मविश्वास तर वाढतोच, शिवाय सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो. प्राणायामामुळे मनातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ध्यानामुळे मन स्थिर होते आणि माणसाला एकांतातही आनंदी राहण्याची कला अवगत होते.
कष्ट आणि सुखाची व्याख्या "कष्ट शरीराला होतात आणि दुःख आत्म्याला. जीवनात जेवढे जास्त कष्ट उपसाल, तेवढ्याच उंचावर तुम्ही जाल. याउलट, जीवनात जेव्हा प्रमाणाबाहेर सुख येते, तेव्हा माणूस 'बेहोशी'मध्ये जातो. अशा वेळी साधनाच माणसाला खरा जीवनमार्ग दाखवते. तप केल्याने व्यक्तित्व निखरते," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी गौतम बुद्धांची एक प्रेरणादायी कथा सांगितली. राजवाड्यातील सुखसंपन्न जीवन जगत असताना माणूस म्हातारा होतो, आजारी पडतो आणि मृत्यू अटळ आहे, याची जाणीव बुद्धांना नव्हती. परंतु जेव्हा त्यांनी वृद्ध, आजारी व मृत व्यक्ती पाहिल्या, तेव्हा जीवनाचे खरे सत्य त्यांच्या लक्षात आले आणि त्यातूनच ध्यान, साधना व आत्मज्ञानाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. माणसाने सतत सकारात्मक विचार करत राहिले पाहिजे, कारण सकारात्मकतेमुळे नकारात्मकता आपल्या जवळ येत नाही. नियमित व्यायाम, योग, प्राणायाम व ध्यान केल्यास मानसिक व शारीरिक विकास होण्यास मोठी मदत होते. अशा साधनेमुळे मन प्रसन्न राहते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवन अधिक संतुलित व आनंदी बनते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वामी ब्रह्मचैतन्य यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की या जगात कोणीही कोणावाचून राहत नाही, माणूस गेल्यानंतर काही दिवसांत सर्व काही पूर्ववत होते, त्यामुळे जीवनात अनावश्यक ताण घेऊ नये. नियमित व्यायाम, योग व प्राणायाम केल्यास माणूस अधिक काळ निरोगी व सुदृढ राहू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या तणाव, अभ्यासातील एकाग्रता, भीती व संभ्रम यावर उपाय सांगताना त्यांनी सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची असल्याचे नमूद केले. व्याख्यानानंतर स्वामीजींनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे विशेष 'भस्त्रीका व ध्यान सत्र' घेण्यात आला तसेच सुमारे १८ मिनिटांचे ध्यान सत्र घेण्यात आले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना मानसिक शांतता, आत्मविश्वास व ऊर्जाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघश्याम पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. रमेश चौगुले यांनी अध्यक्षीय समारोप केला व तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. जितेंद्र शिंदे यांनी आभार मानले. विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमास हजर होते.

