कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शहरात उघडपणे अवैध धंदे सुरू असल्याची गंभीर चर्चा रंगू लागली आहे. मटका, क्लबवर पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात रात्री आठ वाजल्यानंतर महिला व मुलींना मोकळेपणाने फिरणे कठीण झाले असून रोडरोमिओंचा त्रास वाढल्याची तक्रार आहे. काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये पोलिसांसमोरच तुंबळ हाणामारी झाली होती. त्यानंतर एका स्थानिक गायकाला पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली असल्याची चर्चा आहे.
शहरातील प्रमुख चौक, काही पानटपऱ्या तसेच मोजक्या लॉजवर मटका घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. भुरट्या चोऱ्या, मोबाईल चोरी, साखळी चोरी आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना “तपास सुरू आहे” या उत्तरापलीकडे कारवाई होत नसल्याची नागरिकांची भावना आहे. त्यामुळे तक्रार देण्यासाठीही लोक पुढे येत नसल्याचे चित्र आहे.