कळंब (प्रतिनिधी)-  मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना गुरुवारपासून सुरू झाल्याने शहरातील फळबाजारात चैतन्य संचारले असून बाजार बहरला आहे. इफ्तारसाठी रसदार फळांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. कलिंगड, खरबूज, पपई, सफरचंद, चिक्कू यांना विशेष मागणी असून द्राक्षे व आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. मात्र टरबूजाची आवक कमी असल्याने खरबूज भाव खात असल्याचे चित्र आहे.

सध्या बाजारात विविध फळांची आवक वाढली असली तरी मागणीच्या तुलनेत काही फळांचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे दरात सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषतः सफरचंद व डाळिंबाचे दर अनेक दिवसांपासून वाढत्या स्तरावर असून दोन्ही फळांचे दर प्रतिकिलो 200 रुपयांच्या पुढे गेले आहेत. कलिंगड, खरबूज, मोसंबी यांची आवक मर्यादित असल्याने त्यांचे दरही वाढले आहेत.

यंदा चार महिने गारठा अधिक जाणवत होता. सध्या वातावरणात गारवा व उष्णता दोन्ही जाणवत असले तरी फेब्रुवारीपासून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. रमजान महिन्याची सुरुवात आणि वाढते तापमान यामुळे फळांना मागणी वाढत असल्याचे फळ विक्रेते शाहरुख बागवान यांनी सांगितले. इफ्तार पार्टींचे आयोजन करणारे मंडळे व संस्था मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी करत असल्याने बाजारातील उलाढालही वाढली आहे.

केळीचे दर मात्र स्थिर असून 30, 40 व 50 रुपये डझन या दराने विक्री होत आहे. या महिन्यात पेंड खजूराला विशेष महत्त्व असल्याने महाशिवरात्रीपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली आहे. वातावरणातील बदल लक्षात घेता पुढील काही दिवसांत फळांची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

 
Top