धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 28 सदस्य असणे आवश्यक आहे. महायुतीकडे आता 32 संख्याबळ आहे. आमदार तानाजी सावंतांच्या मतदारसंघातील आठ सदस्यांना वगळून सत्ता स्थापन करणे महायुतीला शक्य आहे. त्यादृष्टीने महायुतीच्या 32 सदस्यांना सहलीवर पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे अद्यापही आमदार सावंतांकडून गोळाबेरीज सुरूच आहे. राष्ट्रवादीला (अजित पवार) अध्यक्षपदाची ऑफर देत आपल्याकडे ओढण्याची नवीन खेळी केली आहे. अजित पवार यांची सासरवाडी धाराशिव तालुक्यातील तेर असल्यामुळे दादांना आदरांजली म्हणून राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव सोशल मिडियावरून विरोधकांनी ठेवला होता.  मात्र राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी ही ऑफर धुडकावून महायुतीत राहण्याची ठाम भूमिका घेतली आहे अशी माहिती पुरोगामी विचारांचे लोकराज्यशी  बोलताना दिली. 

सर्वाधिक 19 जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला. महायुतीत लढून विजयी झालेले शिंदे सेनेचे 7 सदस्य, राष्ट्रवादीचे 6 असे 32 संख्याबळ महायुतीकडे आहे. माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या पत्नीला अध्यक्षपदाचा चेहारा म्हणून पुढे करण्याची खेळी केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सुरेश बिराजदार यांच्या पत्नीला अध्यक्षपद देण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. अशात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी अध्यक्षपदाची ऑफर स्पष्टपणे नाकाराली आहे. कधी महायुतीतील पक्षांसोबत पुण्यात बैठका तर राष्ट्रवादीला अध्यक्षपदाची ऑफर असे फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना महायुतीतील 32 सदस्य ठाम आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अर्चना पाटील यांनाच समर्थन राहील, अशी भूमिका घेतली आहे. 


 
Top