धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाच्या इतिहासात स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या आणि आदर्श शासनव्यवस्था उभारणाऱ्या शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य, धैर्य, दूरदृष्टी, न्यायनिष्ठा आणि संघटन कौशल्याचा गौरव करत त्यांच्या जीवनचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले.
यावेळी एसबीएनएम फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, एस.पी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, वेलनेस फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूजा आचार्य, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, आयटीआयचे व्यवस्थापक प्रा. डी. एम. घावटे तसेच कॅम्पसमधील सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समारंभपूर्वक पार पडले. शिवरायांच्या जयघोषात आणि देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
