भुम (प्रतिनिधी)-  तालुक्यातील एका शिक्षकाला ऑनलाईन फसवणुकीचा मोठा फटका बसला असून सायबर चोरट्यांनी तब्बल पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रदीप जगदाळे या शिक्षकांच्या मोबाईलवर स्टेट बँके ऑफ इंडियाच्या योनो बँकिंग सुविधेसंदर्भात आधार अपडेट करण्याबाबतचा मेसेज आला. संबंधित मोबाईल त्या वेळी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या हातात होता. मेसेजमध्ये बँक खाते बंद होण्याची भीती दाखवत तत्काळ आधार अपडेट करण्यास सांगण्यात आले होते.मेसेजनंतर काही वेळातच ओटीपी  क्रमांक मागण्यात आला. घरातच उपस्थित असलेल्या जगदाळे यांना मोबाईलवर मेसेज अलर्टचा आवाज आल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ मोबाईल आपल्या ताब्यात घेतला असता त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 60 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले. जगदाळे यांनी तात्काळ भूम येथील बँक शाखेत धाव घेतली. शाखा व्यवस्थापक राधेश्याम सोनटक्के यांना सांगताच जगदाळे यांचे बँक खाते होल्ड केले आहे. तसेच त्यांची ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. यावेळी  गुजरात राज्यातील सुरत येथे एटीएममधून 20 हजार रुपये काढण्यात आल्याचेही समोर आले आहे. बनावट लिंकच्या आधारे या शिक्षकास 4 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी बनावट लिंक व ओटीपीच्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित शिक्षकांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधून खाते गोठविण्याची (फ्रीझ) केली असून सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


बँकेचे आवाहन

बँक अधिकारी वारंवार स्पष्ट करतात की बँक कधीही ग्राहकांकडून ओटीपी, पिन किंवा पासवर्ड विचारत नाही.सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ग्राहकांना योनो बँकिंग सुविधा हवी असल्यास त्यांनी परांडा रोडवरील भूम शाखेत संपर्क साधावा. तसेच बँकेच्या नावाने आलेल्या कोणत्याही एपिके लिंकवर जाऊ नये.असे आवाहन शाखा व्यवस्थापक राधेश्याम सोनटक्के यांनी केले आहे.

 
Top