धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह आळणी, धाराशिव या ठिकाणी मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती 2026 धाराशिव आणि राजमाता जिजाऊ अखंड महिला मंडळ यांनी निवासी स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह या ठिकाणी सामाजिक अस्मितेचे भान राखून समाजाचे आपणही काही देणे आहोत या उद्देशाने तेथील उपस्थित मुलींना आरोग्य पर संदेश, पेस्ट वाटप आणि फळांचे वाटप केले.
अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यवस्थित संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन बालगृहातील शिक्षिका रेणुका कुदळे यांनी अत्यंत उत्तम रित्या पूर्ण केले. यावेळी मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा प्रणिता पाटील , सचिव डॉ.अस्मिता बुरगुटे, राजमाता जिजाऊ अखंड महिला मंडळ अध्यक्ष आनंदी पाटील व शशिकला गुंजकर या उपस्थित होत्या.
या वेळी बोलताना प्रणिता पाटील यांनी शाळेतील नियोजनबद्ध शिस्त आणि कार्याचे कौतुक केले. तर डॉ.अस्मिता बुरगुटे बोलताना बालगृहातील शिक्षिकांना मातृत्वाची उपमा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. आनंदी पाटील म्हणाल्या की ज्यावेळेस तुम्हाला काही अडचण असेल त्यावेळेस आमच्या परीने नक्कीच आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू. या कार्यक्रमासाठी सतारा मोरे, संध्या हवालदार, मीरा गपाट, अश्विनी शिंदे, सोनाली कोल्हे, वर्षा मोकासे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालगृहातील शिक्षिका रूपाली कांबळे यांनी केले.
