तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीक्षेत्र तुळजापूर येथे बुधवारी दि. 11 फेब्रुवारी रोजी स्पेनमधील बार्सिलोना येथील 66 वर्षीय भाविक जेवियर यांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. परदेशी भाविकाने केलेल्या या दर्शनाने तुळजापूरात श्रद्धा आणि कौतुकाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
विशेष म्हणजे, जेवियर हे गेल्या दहा वर्षांपासून भारतभ्रमण करत असून त्यांनी भारतातील अध्यात्म, परंपरा, इतिहास आणि संस्कृती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात 14 ऑक्टोबर 2015 रोजी राजस्थानातील पुष्कर येथून केली होती. जेवियर यांची ही यात्रा केवळ भारतभ्रमण नसून एक अद्वितीय अध्यात्मिक पदयात्रा आहे. त्यांनी या कालावधीत तब्बल 50 हजार किलोमीटरचा पायी प्रवास करून भारतातील अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत. ही पदयात्रा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या दीर्घ प्रवासात जेवियर यांनी भारतातील चारधाम, 12 ज्योतिर्लिंग, तसेच गंगोत्री, यमुनोत्री, लेह-लडाख, काश्मीर, कन्याकुमारी यांसह देशातील जवळपास सर्व महत्त्वाच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देत दर्शन घेतले आहे. भारताची अध्यात्मिक परंपरा, विविध संस्कृती, श्रद्धा आणि लोकांचे प्रेमळपण यामुळे आपण अत्यंत प्रभावित झाल्याचे जेवियर यांनी यावेळी सांगितले.
जेवियर यांनी बुधवारी रात्री त्यांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर जेवियर यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “तुळजाभवानी देवी ही शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. या देवीचे दर्शन घेणे हा माझ्या भारतभ्रमणातील अत्यंत महत्त्वाचा आणि अविस्मरणीय अध्यात्मिक क्षण आहे.” स्पेनसारख्या देशातून आलेल्या भाविकाने तुळजापूरात येऊन देवीचे दर्शन घेणे हे तुळजापूरच्या जागतिक धार्मिक महत्त्वाची साक्ष देणारे ठरले आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आणि चर्चा निर्माण झाली आहे.
