धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात महायुती म्हणून लढण्याचे निश्चित झाले होते. मात्र, आमदार तानाजीराव सावंत यांनी भूम, परांडा आणि वाशी या मतदारसंघांत महायुतीशी विसंगत भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश डावलून थेट काँग्रेस आणि उबाठा गटाशी हातमिळवणी केली. महायुतीचा विश्वासघात करणाऱ्या सावंतांच्या या गंभीर कृत्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार केली असल्याचा हल्लाबोल भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला आहे.
या संदर्भात कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये महायुतीने पूर्ण ताकदीनिशी एकजुटीने निवडणूक लढवली. मात्र, सावंतांच्या आडमुठ्या धोरणामुळे भूम-परांडा-वाशी भागात युती होऊ शकली नाही. या गद्दारीबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी अवगत केले आहे. मतांच्या आकडेवारीतून सावंतांची फिक्सिंग उघड झाली आहे. आमदार सावंत यांनी केवळ युती नाकारली नाही, तर महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात रसद पुरवल्याचा दावाही कुलकर्णी यांनी केला आहे. पुराव्यादाखल त्यांनी लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भूम-परंडा-वाशी तालुक्यातील मतांच्या फरकाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. भूम-परांडा-वाशीतून उबाठाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सुमारे दीड लाख मते मिळाली होती. विशेष म्हणजे धाराशिव जिल्हा परिषदमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आठ उमेदवार निवडून आले आहेत. त्यांना आमदार तानाजी सावंत यांनी मुंबईला पक्ष प्रमुखांकडे न घेवून जाता आपल्याकडेच ठेवले आहे. असा टोलाही दत्ता कुंलकर्णी यांनी लगावला आहे.
.jpg)