धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भारतीय समाज, राजकारण व विशेषतः भारतीय मुस्लिम समाजाच्या सामाजिक-शैक्षणिक प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या प्रख्यात विचारवंत डॉ. मोईन शाकिर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जाणीव, सामाजिक समज आणि लोकशाही मूल्यांचे भान निर्माण करणे हा आहे. व्याख्यानमालेत समकालीन सामाजिक प्रश्न, अल्पसंख्याक समाजाच्या समस्या, शिक्षणाची भूमिका, अंधश्रद्धा व असुरक्षिततेमधून मुक्ती यांसारख्या विषयांवर तज्ज्ञ अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत.
या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे उद्घाटन सोमवार, दि. 09 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता होणार असून, डॉ. रमेश चौगुले (संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर, धाराशिव) हे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे (राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर) उपस्थित राहून “डॉ. मोईन शाकिर : व्यक्ती आणि कार्य” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. संदीप देशमुख असतील.
व्याख्यानमालेतील दुसऱ्या पुष्पात, प्रा. डॉ. महेशकुमार मोटे (समन्वयक, राज्यशास्त्र संशोधन केंद्र, श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम) हे “लोकशाही, धर्मनिरपेक्षता : डॉ. मोईन शाकिर यांचे वैचारिक योगदान” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख (सह. मराठवाडा विभाग प्रमुख) राहणार असून, प्र. प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात, प्रा. डॉ. आनंद करडे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी) हे “भारतीय मुस्लिम समाज : मोईन शाकिर यांचा दृष्टिकोन” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या सत्राचे अध्यक्षपद प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे भूषवणार असून, प्र. प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. या व्याख्यानमालेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता, सामाजिक भान, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि चिकित्सक विचारशक्ती विकसित होईल, असा विश्वास महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.