कळंब (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग तपासणी अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभारामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. बस तपासणीच्या नावाखाली गाड्या तासन्‌‍तास एकाच ठिकाणी उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बस चालू असताना तपासणी करणे शक्य असताना गाडी थांबवून दीर्घकाळ तपासणी केली जाते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. नियोजित कामांमध्ये उशीर होतो आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतो. दिव्यांग प्रवाशांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेतही अनावश्यक वेळ घेतला जात असल्याची चर्चा आहे. या तपासण्यांच्या नादात वाहकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते. “बस थांबवून नव्हे, तर चालत्या बसमध्येच तपासणी करावी,” अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

एका आदेशानंतर सर्वत्र कडक तपासणी सुरू झाल्याने काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. प्रवाशांचा वेळ आणि सोयीचा विचार करून तपासणी प्रक्रियेत सुसूत्रता आणावी. तसेच अनावश्यक विलंब टाळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या सूचना कराव्यात. जेणेकरून प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि बससेवा अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 
Top