तुळजापूर (प्रतिनिधी)- अमहिला एकदा संसारामध्ये गुरफुटल्या तर त्यांना चूल व मूल यातून बाहेर निघणे अशक्यच असते. त्यामुळे त्यांच्या शरीराची हालचालही होत नसल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. याचाच विचार करून महिलांनीही क्रीडांगणावर उतरले पाहिजे, तिने कोणता तरी शारीरिक खेळ हा खेळला पाहिजे जेणेकरून ती शारिरीक तंदुरूस्तीमुळे आरोग्य विषयक सक्षम होईल या उदात्त हेतूने कोरो इंडिया व एकल महिला संघटना यांच्या वतीने दरवर्षी तालुका व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी तुळजाभवानी स्टेडियम तुळजापूर येथे तालुकास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सारोळा येथील प्रगती महिला संघाने प्रथम क्रमांक, तीर्थ येथील पंचशील महिला संघ द्वितीय तर बोरी येथील रमाई महिला संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
विजेत्या संघांना विजयालक्ष्मी फार्मर कंपनी एस. एस. पी. तर्फे प्रथम बक्षीस पाच हजार, पोलीस मित्र संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष अनिता लष्करे यांच्यातर्फे तीन हजार तर हंगरगा (तुळ) चे सरपंच रवी शिरसट यांच्यातर्फे दोन हजार रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी विजयालक्ष्मी फार्मर कंपनीच्या संचालिका सौ. वैशाली घुगे, एकल महिला संघटना कोरोच्या सौ. श्वेता पगारे, पोलीस मित्र संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती अनिता लष्करे, एकल महिला संघटना तुळजापूर तालुका अध्यक्षा सौ. पार्वती भगत, तालुका क्रीडा अधिकारी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये तब्बल 11 संघांनी सहभाग घेतला होता. सर्व संघाच्या खेळाडूंना तालुका क्रीडा अधिकारी पवार यांनी मार्गदर्शन केले. सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोरो इंडिया व एकल महिला संघटनेच्या पदाधिकारी उज्वला पवार, सुवर्णा नन्नवरे, उर्मिला म्हंकराज, सुरेखा भोसले, महानंदा चव्हाण कोरोची सर्व पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धा पाहण्यासाठी तुळजापूर शहरासह तालुक्यातील विविध गावच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
