तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत येणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. संबंधित प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सादर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शाळेची शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून काही शिक्षकांच्या निष्क्रीय आणि हलगर्जी कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही शिक्षक प्रामाणिकपणे ज्ञानदान करण्याचे काम करत आहेत. मात्र काही शिक्षक वर्गावर न जाता तासंतास कार्यालयात बसून मोबाईल वापरणे, शाळेच्या आवारात विनाकारण वेळ घालवणे, कोणालाही न सांगता शाळेला दांडी मारणे तसेच परस्पर रजा ॲडजस्ट करणे असे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत ग्राउंडवर बसवून विविध कार्यक्रमांच्या नावाखाली वेळ वाया घालवला जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे. या प्रकारांमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण बिघडत असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एखाद्या विद्यार्थ्याने पालकांकडे तक्रार केल्यास त्या एकट्या विध्यार्थ्याला अपमानास्पद बोलणे किंवा टॉर्चर करत असल्याच्या प्रकार समोर आला आहे.
यापूर्वी संबंधित शिक्षकांना कार्यपद्धती सुधारण्याबाबत अनेकदा विनंती करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. मात्र त्यात कोणताही सकारात्मक बदल झालेला नसल्याने आता प्रशासनाने तातडीने चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील शालेय व्यवस्थापन समितीने व पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर शिक्षण विभाग काय भूमिका घेते आणि संबंधित प्रकरणात कोणती कारवाई होते, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.