धाराशिव (प्रतिनिधी)-  रोटरीच्या 121 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब धाराशिव व रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधुनिक हात-पाय मोजणी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व लाभार्थ्यांना कृत्रिम हात व पायांचे वितरण  जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते व उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या सर्व लाभार्थ्यांना नियोजित कालावधीत आधुनिक जयपूर फूट व कृत्रिम हातांचे यशस्वी वितरण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे 100% यश साध्य करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. रणजित रणदिवे यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार तसेच आरडीसी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी अशा सेवाभावी उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांना नवजीवनाची संधी मिळते व समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव रो. पी. आर. काळे, रो. बाळासाहेब देशमुख, रो. प्रदीप मुंडे, रो. संजय देशमाने, रो. डॉ. श्रीराम जिंतूरकर, रो. सुनिल गर्जे, रो. सुरज कदम, रो. चंद्रसेन देशमुख तसेच इतर मान्यवर व रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांना नवसंजीवनी मिळाली असून समाजातील गरजू घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा रोटरी क्लब धाराशिवचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. उपस्थित लाभार्थ्यांनी व नागरिकांनी या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले.


 
Top