तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील समस्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे मंगरुळ येथील ग्रामदैवत श्री कंचेश्वर महाराज यांचा वार्षिक यात्रा महोत्सव दि. 15 फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून आयोजित या महोत्सवात तीन दिवस विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.


असा असेल सोहळा:

यात्रेचा प्रारंभ रविवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी (महाशिवरात्री) पहाटे 5 वाजता श्रींच्या विधीवत अभिषेकाने होईल. सकाळी 9 वाजता काठीची स्थापना, त्यानंतर भजन आणि सायंकाळी 5 वाजता श्रींच्या काठीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री 9 वाजता झी टॉकीज फेम ह.भ.प. नवनाथ माने यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

सोमवार, दि. 16 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात भजन आणि दुपारी 4 वाजल्यापासून श्रींची पालखी व काठीची भव्य मिरवणूक निघेल. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे अश्व, शोभेची दारूकाम आणि हलगी-बँजो पथकांचा निनाद असणार आहे. रात्री 12 वाजता श्रींची महाआरती संपन्न होईल. मंगळवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री 7 वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. तरी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री कंचेश्वर महाशिवरात्र यात्रा महोत्सव समितीने केले आहे.


भक्ती अणि शक्तीचा संगम पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहा.

“कंचेश्वर महाराज हे आमचे जागृत दैवत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही मोठ्या उत्साहात यात्रेचे नियोजन केले आहे. भक्ती आणि शक्तीचा हा संगम पाहण्यासाठी परिसरातील सर्व भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे.“

 अजिंक्य सरडे, ग्रामस्थ 


“शिवाच्या चरणी नतमस्तक होण्याची ही पर्वणी आहे. पालखी सोहळा आणि महाप्रसादाच्या माध्यमातून मंगरुळमध्ये भक्तीचा महाकुंभ भरतो. या मंगलमय वातावरणात सर्व भक्तांनी सहभागी होऊन आशीर्वादाचा लाभ घ्यावा.“

 यात्रा संयोजन कमिटी, मंगरुळ.

 
Top