तुळजापूर (प्रतिनिधी)-  जिद्द,चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सुपुत्र जयदीप जयाजी देशमुख याने वाणिज्य क्षेत्रातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या सीएमए (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जयदीपने यशाचे शिखर गाठले आहे.


अत्यंत कठीण परीक्षा,पण जयदीप ठरला सरस! 

यावर्षी देशभरातून 19525 विद्यार्थ्यांनी सीएमए फायनलची परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ 999 विद्यार्थीच यशस्वी झाले आहेत. या अत्यल्प निकालातही जयदीपने आपले नाव कोरल्याने त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यापूर्वी मार्च 2024 मध्ये इंटरमिजिएट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल पुणे चाप्टरच्या वतीने त्याचा विशेष गौरवही करण्यात आला होता.


शैक्षणिक प्रवास आणि यश

जयदीपचे प्राथमिक शिक्षण सोलापूर येथील श्राविका प्रशालेत, तर माध्यमिक शिक्षण हरीभाई देवकरण प्रशालेत झाले. सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयातून त्याने वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली. 2022 मध्ये त्याने सनदी लेखापाल (सीएमए) प्रवासाला सुरुवात केली. फाउंडेशन, इंटरमिजिएट, इंटर्नशिप आणि आता फायनल असा टप्पा त्याने मोठ्या मेहनतीने पूर्ण केला आहे. सध्या तो पुण्यामध्ये पुढील व्यावसायिक सराव करत आहे.

 
Top