वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी या संस्थेचा आदर्श शाळा पुरस्कार वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयास प्रदान करण्यात आला. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास थोरबोले यांना कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथे संस्थेतील गुणवंत व सेवानिवृत्त कर्मचारी पुरस्कार प्रदान समारंभ या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश लोंढे जॉईंट कमिशनर इन्कमटॅक्स मुंबई,कार्यक्रमाचे अध्यक्ष एन.एन. जगदाळे, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,बार्शी व संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी. वाय.यादव, सचिव पी.टी.पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार व खजिनदार जे.सी.शितोळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातील विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी,इयत्ता दहावी परीक्षेत विद्यालयाचा दैदीप्यमान निकाल,विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश,विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी वर्षभरात विद्यालयाने आयोजित केलेले विविध उपक्रम या आधारे विद्यालयास आदर्श शाळा पुरस्कार व विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास थोरबोले यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
