भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील वालवड येथील डीसीसी बँकेच्या शाखेची तिजोरी गॅस कटरच्या साह्याने तोडून चोरीची घटना घडली आहे. ही घटना रविवार दिनांक 22 रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये चोरट्यांनी तिजोरीतील वीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. या चोरीच्या घटनेतील रक्कम जरी कमी असली तरी या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची वालवड येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीमध्ये शाखा आहे. शनिवारी कार्यालयातील कर्मचारी बँकेचे कामकाज संपल्यानंतर बँकेस कुलूप लावून गेले होते. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय वालवडचे कर्मचारी रवी चव्हाण हे कार्यालयात आले होते. यावेळी त्यांना कार्यालयाच्या पाठीमागील खिडकी कट केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती त्यांनी सरपंच व उपसरपंचांना तसेच पोलीस पाटलांना दिली. या सर्वांनी तातडीने परिसराची पाहणी केली असता त्यांना बँकेची तिजोरी गॅस कटरच्या साह्याने तोडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तातडीने भूम पोलीस ठाण्यास देण्यात आली.

घटनेची माहिती मिळतात भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले व पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संपूर्ण घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top