भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील विजोरा येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असताना सकाळी सुमारे 7:40 वाजता टेबलवरील मतदान मशीन खाली आपटून मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा आणून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तालुक्यातील विजोरा येथे एका जणांच्या विरोधात वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मतदान केंद्रावर दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान मशीनचे प्रात्यक्षिक ठरलेल्या वेळेप्रमाणे घेऊन सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यावेळी विजोरा येथील महादेव कोंडीबा जाधव हे सकाळी 7:40 वाजता मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता त्यांनी मला मतदान मशीनचे प्रात्यक्षिक पुन्हा दाखवा माझा मतदान मशीनवर विश्वास नाही असे म्हणत प्रात्यक्षिक पुन्हा दाखवण्याची मागणी केली. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष नेताजी शिंदे यांनी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवता येणार नाही. तुम्ही मतदान करून जाऊ शकता असे सांगितले. यावेळी महादेव जाधव यांनी चिडून मतदान मशीन टेबलवरून खाली जोरात आपटली. यामुळे मतदान प्रक्रियेत बाधा येऊन शासकीय कामात अडथळा आणला असल्याची तक्रार मतदान केंद्राध्यक्ष नेताजी नेताजी शिंदे यांनी वाशी पोलिसांना दिल्यावरुन महादेव जाधव यांचे विरोधात मतदान प्रक्रियेत अडथळा आणणे व शासकीय कामात अडथळा आणणे या कलमाखाली गुन्हा नोंद केला असून पोहेका बाळासाहेब औताडे हे पुढील तपास करत आहेत.
मतदान प्रक्रियेदरम्यान काही मतदारांनी मतदान केंद्रात मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध केलेला आहे. त्यानुसार आज वाशी पोलिसांच्या पथकाने 90 मोबाईल जप्त केलेले आहेत. सदरील मोबाईल हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत अशी माहिती वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी दिली आहे.
