भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील तेरखेडा हे गाव फटाका उद्योगासाठी गाजलेले असून या ठिकाणी तेरखेडा गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये फटाके बनवण्याचे कारखाने उभारलेले असून सध्या ते जोमात सुरू असून या कारखान्यात अधून मधून स्पोट होत आहेत. या स्फोटामुळे अनेकांना आपले जीवन गमवावे लागले आहेत तर अनेकांना गंभीर जखमा होऊन अपंगत्व आलेले आहे असे असतानाही संबंधित फटाका बनवणाऱ्या कारखाना मालकाकडून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात नसल्याने सतत होणाऱ्या स्फोटातून दिसून येत आहे. दि. 31 जानेवारी रोजी तेरखेडा बावी रस्त्यावरील खामकरवाडी शिवारातील फटाका कारखान्यात प्रचंड मोठा स्पोट झाला होता. त्याचा अहवाल अद्याप पर्यंत आलेला नसताच आज दि. 6 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील गोजवाडा शिवाराततील फटाका कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट झालेला आहे. यामध्ये फटाका कारखान्याचे शेड पूर्णपणे उध्वस्त झालेले असून यामध्ये कसलीही जीवित हानी झालेली नसल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तालुक्यातील बोरी फाटा ते गोजवडा रोडवरील गोजवाडा शिवारातील गट क्रमांक 561 मध्ये सुरू असलेल्या बालाजी उकरंडे रा. तेरखेडा यांचे बालाजी फायर वर्क या कारखान्यात दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास कच्चा माल ठेवलेल्या ठिकाणी स्फोट झाला. या ठिकाणी 40 किलोपेक्षा जास्त मिक्स केलेली स्फोटकाची दारू आढळून आलेली असून स्पोट झालेल्या कारखान्यात कोणीही जखमी अथवा मयत झाले नसल्याचा जबाब परवानाधारक यांच्या वडिलांनी दिला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप तरी समजू शकले नाही. तथापि उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांचे पथक घटनास्थळी येत असून ते अधिक सविस्तर चौकशी करणार आहेत.
दरम्यान 31 जानेवारी रोजी झालेल्या स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसून धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी वाशीचे तहसीलदार यांना स्फोट नेमका कशामुळे झाला याची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास कळविण्याचे आदेश दिलेले आहेत. याबाबत वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांना विचारणा केली असता उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय यांचे पथक घटनास्थळी जाऊन चौकशी करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयास देणार असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदरील अहवाल जिल्हाधिकारी यांना देणार असल्याचे सांगितले.
सतत होत असलेल्या स्फोटामुळे फटाका कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे जीवितास धोका निर्माण होत असून फटाक्या कारखान्याकडून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे यावरून दिसून येत आहे औद्योगिक सुरक्षा संचलनालयाकडून सदरील कारखान्यांना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची गरज असल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.
