धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीपासूनच या निवडणुकीत मतदारांचा अपेक्षेइतका उत्साह दिसून आला नाही. मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसून आले. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 50 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाला वेग येवून 65 ते 70 टक्क्यापर्यंत मतदान होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

तालुकानिहाय मतदानाची स्थिती पाहता, भूम तालुक्यात एकूण 55331 मतदारांनी मतदान केले असून तेथील मतदानाची टक्केवारी 54.18 इतकी आहे. वाशी तालुक्यात दुपारी दीड वाजेपर्यंत 34326 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 51.53 नोंदवली गेली आहे. कळंब तालुक्यात 82763 मतदारांनी मतदान केले असून तेथील मतदानाची टक्केवारी 50.77 इतकी आहे. धाराशिव तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले असून एकूण 118463 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. मात्र, मतदारसंख्या मोठी असल्याने तेथील मतदानाची टक्केवारी 47.41 इतकीच राहिली आहे.

परंडा तालुक्यात 56665 मतदान झाले असून टक्केवारी 52.83 इतकी नोंदवली गेली आहे. तुळजापूर तालुक्यात सकाळपासूनच मतदानाचा उत्साह तुलनेने अधिक दिसून आला. येथे एकूण 99863 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 51.24 इतकी आहे.


लोहारा तालुक्यात 41753 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 46.71 आहे. उमरगा तालुक्यात 84563 इतके मतदान झाले असून तेथील टक्केवारी 48.97 इतकी नोंदवली गेली आहे. जिल्हा पातळीवर एकूण 5 लाख 73 हजार 727 मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये 2 लाख 96 हजार 84 पुरुष मतदारांचा तर 2 लाख 77 हजार 41 महिला मतदारांचा समावेश आहे.

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 50 टक्के इतकी आहे. दरम्यान, मतदानासाठी अखेरचे दोन तास शिल्लक असून या वेळेत मतदानाला गती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. आता अंतिम दोन तासांत मतदारांचा प्रतिसाद किती वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज दिनांक 07.02.2026 रोजी जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोकर, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी मेघना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी  शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे यांनी धाराशिव तालुक्यातील मौजे शेकापूर येथील हरीत धाराशिव, पिकं बुथ या संकल्पनेतून साकारलेल्या आदर्श मतदान केंद्रास व मौजे सांजा येथील महिला मतदान केंद्रास भेट देऊन निरीक्षण केले व मतदाराशी संवाद साधला.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top