धाराशिव (प्रतिनिधी)- खामसवाडी (ता. कळंब):आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. खामसवाडी येथे आयोजित भव्य प्रचार सभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत, ग्रामीण विकासासाठी आणि जनतेच्या न्याय्य हक्कासाठी मशाल चिन्हावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर खामसवाडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कु. मनिषा बालाजी वाघमारे, खामसवाडी गणाच्या उमेदवार सौ. सुवर्णा दयानंद पाटील आणि देवळाली गणाचे उमेदवार श्री. उमाकांत बन्सी एडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतकरी, महिला आणि तरुणांच्या मूलभूत प्रश्नांवर भाष्य केले. “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा केवळ राजकारण करणारा पक्ष नसून, तो जनतेच्या विश्वासावर उभा राहिलेला लढाऊ विचार आहे,“ असे त्यांनी नमूद केले. उमेदवारांचा निर्धार: कु. मनिषा वाघमारे, सौ. सुवर्णा पाटील आणि उमाकांत एडके यांनी जनतेला प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार आणि गावोगावच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. या सभेला परिसरातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
