धाराशिव (प्रतिनिधी)- जुन्याच योजनांना नवी नाव देऊन मांडलेला हा अर्थसंकल्प म्हणजे जुनीच दारू नव्या बाटलीत असा असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत व हमीभावाबाबत कसलीही स्पष्टता नसल्याने तो गरीब विरोधी व केवळ आकड्यांचा खेळ असून सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल देणारा, वाढती बेरोजगारी व गगनाला भिडलेली महागाई कमी करण्यासाठी कोणतीही ठोस तरतूद नसलेला फसवा व दिशाभूल करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर केला असल्याची टीका समाजवादी नेते ॲड. रेवण भोसले यांनी केली आहे.
अर्थसंकल्प हा केवळ मोठ्या भांडवलदारांचा विकास करण्यासाठी असून तो शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे.काही राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांची खैरात करणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात खोटी आश्वासने देऊन स्वप्न दाखवणाऱ्या केंद्र सरकारचे समर्थन महायुतीचे पुढारी इमाने इतबारे टिमकी वाजवत करत आहेत. तसेच सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी व कष्टकरी कामगारांच्या प्रश्नाकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करून ठराविक उद्योगपतींचे उखळ पांढरे करण्यासाठीच केंद्र सरकारने हा अर्थसंकल्प मांडला असल्याचे ॲड.भोसले यांनी म्हटले आहे.
