धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय, शिक्षण विभाग धाराशिव व नरेंद्र आर्य विद्यालय आपसिंगा यांच्या संयुक्त विद्यमाने आपसिंगा ता. तुळजापूर येथे कब-बुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दि. 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या मेळाव्यास धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थी एकत्रित येऊन आपापल्या कलागुणांना सादर करतात व यातून एकता साधली जाते. वेगवेगळ्या शाळेतील मुले तीन दिवस तंबूमध्ये निवास करून खेळतात, बागडतात व आपल्या कला सादर करतात.

मेळाव्यात वेगवेगळ्या स्पर्धा देखील असतात. या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही मुले आपल्याला व आपल्या शाळेला योग्य ते बक्षीस प्राप्त करून तीन दिवस एकत्रित राहून शेवटच्या दिवशी आपापल्या शाळेकडे रवाना होतात. अशा प्रकारचा हा आनंद मेळावा आपसिंगा येथे होत आहे. या मेळाव्याची पूर्वतयारी जिल्ह्यातील स्काऊट गाईड शिक्षक  शिक्षिका 4 फेब्रुवारीपासून करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 5 रोजी  ॲडव्हान्स पार्टी शिक्षक,  शिक्षिकांनी नरेंद्र आर्य विद्यालय आपसिंगा येथे उपस्थित राहून मेळाव्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सोयी निर्माण करून दिल्या. यामध्ये वेगवेगळे गॅजेट्स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था इत्यादी बाबींची देखभाल करून सर्व पूर्वतयारी केली आहे.


 
Top