धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 अनुषंगाने मतदान प्रक्रिया शांततेत,निर्भय व सुरळीत पार पडावी,या उद्देशाने जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 15 आठवडी बाजार 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परंडा, कळंब व वाशी या पंचायत समित्यांमध्ये मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या आदेशानुसार धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ.), जागजी,बामणी; तुळजापूर तालुक्यातील निलेगाव,जळकोट,आरळी (बुद्रुक); उमरगा तालुक्यातील तुरोरी,समुद्राळ, केसर जवळगा;भूम तालुक्यातील ईट; कळंब तालुक्यातील मंगरुळ,नायगाव, पिंपळगाव (कोठावळा); तसेच वाशी तालुक्यातील तेरखेडा व बावी या 15 गावांतील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी भरविण्यात येणार नाहीत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.