कळंब (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात बेकायदेशीर अफू शेती प्रकरणी एकामागून एक कारवाया उघड होत असून प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. कालच लोहटा पश्चिम (ता. कळंब) येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 50 किलो 11 ग्रॅम अफूची गोंडे-फुले जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची अंदाजे किंमत 7 लाख 51 हजार 650 इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गट क्रमांक 175, 236 आणि 227 येथे ही बेकायदेशीर शेती सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिराढोण पोलीस स्टेशन पथकाने धाड टाकली. छाप्यात अफूची लागवड उघडकीस आली आणि मोठ्या प्रमाणात तयार माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अशोक ज्ञानोबा अडसूळ, नरसिंग अडसूळ आणि निलेश शिवाजी पवार (सर्व रा. लोहटा पश्चिम, ता. कळंब) यांना 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत अमना, उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धरणीधर बाबा कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर पवार, हेड कॉन्स्टेबल परमेश्वर मेंगले आणि कबीरदास गायकवाड यांच्या पथकाने ही केली.
धाराशिव जिल्ह्यात सतत उघड होणाऱ्या अफू शेती प्रकरणांमुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अजून किती ठिकाणी अशी बेकायदेशीर शेती सुरू आहे? प्रशासनाच्या या धाडसी कारवाईनंतर जिल्हाभरात खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
