तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत प्रारंभापासूनच चर्चेत असलेल्या शहापूर जिल्हा परिषद गटात अखेर शिवसेना शिंदे गटाने आपला झेंडा रोवत मतदारसंघ ताब्यात घेतला आहे. दोन शिवसेनांमध्ये थेट लढत झालेल्या या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे बहुचर्चित उमेदवार सुनील बनसोडे यांनी 576 मतांनी विजय मिळवला. शहापूर गट हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून, येथे निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.


दोन शिवसेनेत थेट लढत; सुनील बनसोडे विजयी

शहापूर जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुनील बनसोडे यांना 6268 मते मिळाली. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कचरू सकट यांना 5682 मते मिळाली. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशोक जाधव 539 मते, अपक्ष उमेदवार स्वामी 703 मते या निकालात सुनील बनसोडे यांनी 576 मतांनी विजय मिळवून शहापूर गटावर शिंदे गटाचा भगवा फडकवला. राजकीय जाणकारांच्या मते, शरद पवार गटाच्या उमेदवाराने घेतलेली मते महाविकास आघाडीला नुकसानकारक ठरली, त्यामुळे ठाकरे गटाचा विजयाचा मार्ग कठीण झाला.


यवती गणही शिंदे गटाकडे; प्रियंका मिटकरी निसटत्या फरकाने विजयी

शहापूर गटातीलच यवती गणात शिवसेना शिंदे गटाच्या प्रियंका मिटकरी यांनी निसटत्या फरकाने विजय मिळवला.


यवती गणातील निकाल पुढीलप्रमाणे:

प्रियंका मिटकरी (शिंदे गट) 3597 मते, नंदा साखरे (काँग्रेस) 3346 मते, संध्या सुरवसे 350 मते यामध्ये प्रियंका मिटकरी यांनी 251 मतांनी निसटता विजय मिळवत यवती गण शिंदे गटाच्या ताब्यात दिला.


शहापूर गणात ठाकरे गटाचा विजय; जयश्री कोळी 645 मतांनी पुढे

दरम्यान, शहापूर गटातील शहापूर गणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जयश्री कोळी यांनी विजय मिळवला.


निकाल:

जयश्री कोळी (उबाठा) 2944 मते, मनीषा खरात (भाजप) 2299 मते, तसलीम मुलानी : 607 मते यात जयश्री कोळी यांनी 645 मतांनी विजय मिळवला.


सुनील बनसोडेंनी आधी भाजपकडे मागितली होती उमेदवारी!

शहापूर गटातून विजयी झालेले सुनील बनसोडे यांनी यापूर्वी काक्रंबा जिल्हा परिषद गटातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र ती न मिळाल्याने अखेर त्यांना शहापूर गटातून शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी संधीचे सोने करत थेट विजय मिळवला.


आमदार राणाजगजीतसिह पाटील यांची रणनीती ठरली यशस्वी!

शहापूर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी आमदार पाटील यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजकीय वर्तुळात सध्या अशी चर्चा रंगली आहे की, “आमदार राणा पाटील यांनी एका गटात दोन पक्षी मारल्याची रणनीती यशस्वी केली. या निकालामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. तर शिंदे गटाला येथे राजकीय लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे.


निवडून आलेले उमेदवार सहलीला? तालुक्यात चर्चेचा विषय!

दरम्यान, शहापूर गटातून निवडून आलेले उमेदवार भाजप जिल्हा परिषद सदस्यांसोबत सहलीला गेल्याचे सोशल मीडिया वरून झालेल्या चर्चेतून समजते. यामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे पुढील राजकीय घडामोडींबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 
Top