धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव नगर परिषदेचा 2026-27 चा अर्थसंकल्प लेखा अधिकारी तनवीर जमादार यांनी मांडला. या अर्थसंकल्पात नगराध्यक्ष नेहा काकडे व मुख्याधिकारी यांना फिरण्यास वाहने खरेदी करण्यासाठी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून जागेचे भाडे वसूल करण्यासाठी ठेकेदार नेमण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठेकेदार नेमण्यापेक्षा न. प. कर्मचाऱ्यांकडून वसुली करावी असे शिवसेनेचे नगरसेवक राजाभाऊ पवार यांनी मांडले होते. 

या आर्थिक वर्षाचा 5 लाख 81 हजार 513 रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला असला तरी राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी एक रुपयाच्या निधीची तरतूदच केली नाही हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

धाराशिव नगर परिषदेच्या सभागृहात दि.27 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्यासह सर्व विषय समिती सभापती आणि सर्व नगरसेवकाच्या उपस्थितीत 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प 314 कोटी 21 लाख 54 हजार 875 रुपयांचा आहे. यामध्ये महसुली जमा 58 कोटी 84 लाख रुपये ग्राह्य धरला असून खर्च 58 कोटी 80 लाख रुपयांची अपेक्षा केली आहे. तसेच भांडवली जमा रक्कम 254 कोटी 63 लाख रुपये अपेक्षित असून, खर्च 254 कोटी 34 लाख रुपयांचा ग्राह्य धरला आहे. प्रारंभी शिल्लक रक्कम 74 लाख 6 हजार रुपये तर महसुली व भांडवली अशी एकूण जमा रक्कम 313 कोटी 47 लाख 48 हजार 773 होणार आहे. मात्र, जमा रकमेपैकी 314 कोटी 15 लाख 63 हजार 362 रुपये खर्च ग्राह्य धरण्यात आले आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ पवार, नाना घाडगे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इस्माईल शेख यांनी अर्थसंकल्पासंदर्भात विविध प्रश्न विचारले.


घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्षाला आठ कोटी रुपयांचा खर्च येतो. मात्र या अर्थसंकल्पात फक्त दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून पुन्हा शहर कचरामुळे व दुर्गंधीयुक्त करणार का असा प्रश्न या तरतुदीमुळे निर्माण झाला आहे. तसेच नदी संवर्धन योजनेसाठी एक रुपयाची देखील तरतूद केलेली नाही.  तर रस्ता फंडसाठी देखील कुठलीही तरतूद नाही. याबरोबरच जिल्ह्याचे मुख्यालय असताना देखील शहरात विशेषतः गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या सोईसाठी अत्यावश्यक असलेल्या स्वच्छतागृहासाठी देखील एक रुपयाची तरतूद केली नाही. 2026-27 चे उत्पन्नामध्ये जाहीरात बॅनर कर निरंक दाखविण्यात आले आहे. त्यामुळे नुसता आकड्याचा खेळ अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. 

राजाभाऊ पवार

नगरसेवक ठाकरे शिवसेना

 
Top