धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या कोथळा गावात (दि. 5) शिवसेना (उबाठा) गटाचे माजी सरपंच तथा जयहिंद किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. दीपक बाबुराव जाधव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे उबाठा सेनेला मोठा धक्का बसला आहे.
भाजप नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत आणि सत्कार केला. दीपक जाधव यांनी यापूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षात जिल्हा सचिव म्हणून जबाबदारी पार पडलेली आहे. तसेच जयहिंद किसान संघटनेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात शेतकरी प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने ठोस आणि प्रभावी कार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कळंब तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार आहे. हा पक्षप्रवेश भाजपा जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दीपक जाधव आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे भाजपात स्वागत केले. त्यांच्या सामाजिक व शेतकरी चळवळीतील कार्याची दखल घेत, भविष्यात भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणीत योग्य जबाबदारी देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी कोथळा गावासह कळंब तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त केला. प्रवेश सोहळ्यात दीपक बाबुराव जाधव यांच्या समवेत श्रीकृष्ण अशोक पाटील, बसवेश्वर महादेव भागुडे, उमेश गोळप्पा मोदी, शिवाजी सहदेव भागुडे, सोमनाथ लोखंडे, गुलाब जाधव, शिवाजी राख, गौतम कांबळे, अखिल सौदागर, आबासाहेब गंभीरे व इतर कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कळंब तालुक्यात भाजप संघटन अधिक भक्कम होत असून येणाऱ्या काळात शेतकरी, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी भाजप अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी दीपक जाधव यांनी व्यक्त केली.
