कळंब (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील पहिले देहदान आणि धाराशिव जिल्ह्यातील सहावे देहदान मंगळवार दि. 21 रोजी घडून आले असून, ही घटना समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि धाराशिव जिल्हा संप्रदाय यांच्या माध्यमातून वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील कै. मनीषा पंडित निरगुडे (वय 46) यांनी देहदानाचा संकल्प प्रत्यक्षात साकारला. अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. निधनापूर्वी काही दिवस त्यांनी देहदान करण्याची स्पष्ट इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेचा सन्मान राखत पती पंडित निरगुडे, मुलगी तसेच इतर नातेवाईकांच्या संमतीने त्यांचे पार्थिव धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आले. या देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मोलाची मदत होणार आहे. निधनाची माहिती मिळताच संप्रदायचे वाशी येथील माजी जिल्हाध्यक्ष विजय भारती, तालुकाध्यक्ष बंडू पवार, सचिव शिवाजी सारुक यांनी तातडीने पिंपळगाव गाठले. तेथील कार्यकर्ते पंडित सुकाळे, विलास कोल्हे, सुधीर निरगुडे, त्रिशाला निरगुडे व अनिता जगताप यांच्या सहकार्याने धाराशिव जिल्हा कमिटी व शासकीय मेडिकल कॉलेजशी संपर्क साधून देहदानाची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पाडली.
या प्रसंगी संप्रदायचे जिल्हाध्यक्ष संतोष केसकर, जिल्हा सचिव कानडे, युवा प्रमुख लक्ष्मी माने तसेच जिल्हा समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कै. मनीषा निरगुडे यांचे देहदान हे समाजासाठी दीपस्तंभ ठरले असून, अंधश्रद्धा, रूढी-परंपरांना छेद देत मानवतेसाठी देहदानाचा आदर्श त्यांनी उभा केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, वाशी तालुक्यात सामाजिक परिवर्तनाची नवी चळवळ सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
