धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक  अशोक पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. 

 या पक्षप्रवेशामुळे  तुळजापूर तालुक्यातील जळकोट जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे प्रकाश चव्हाण व अशोक पाटील यांच्या या प्रवेशामुळे जळकोट जिल्हा परिषद  मतदार संघात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपाचे  जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ  कुलकर्णी,  युवा नेते सुनील चव्हाण,  मल्हार दादा पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, संताजी काका चालूक्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आलियाबाद ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच ज्योतीताई चव्हाण, रामतीर्थ ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा लक्ष्मण राठोड, सेवानिवृत्त नायब तहसिलदार माणिक चव्हाण यासह आजी - माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे आलियाबाद ग्रामपंचायतीवर आजवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र प्रकाश चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या भागात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे.

पक्ष प्रवेशावेळी बोलताना आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांनी भाजपाची विकासाची भूमिका, केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा उल्लेख करत नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एकत्र काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला निश्चितच बळ मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.


 
Top