कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील तरुणांनी शरीर सुदृढ ठेवण्याऐवजी जीवघेण्या नशेचा मार्ग स्वीकारल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. शहरात ‌‘फुलचंद‌’ नावाने ओळखले जाणारे तंबाखूयुक्त पान सातवी-आठवीतील शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांपर्यंत वेगाने पसरत असून, संपूर्ण तरुण पिढीच या व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे.

“मस्त वाटते”, “जोरदार नशा येते” या भूलथापांना बळी पडून तरुणांमध्ये ‌‘कडक पान‌’ खाण्याची स्पर्धाच लागली आहे. मित्रांमध्ये टिंगल-टवाळी करण्यासाठी किंवा ‌‘मजा‌’ पाहण्यासाठी सक्तीने पान खायला लावण्याचे प्रकारही वाढले आहेत. सुरुवातीला गंमत म्हणून सुरू झालेले सेवन कधी कायमस्वरूपी व्यसन बनते, हे या कोवळ्या मुलांना कळतही नाही.


मेंदूवर थेट परिणाम; कर्करोगाचा धोका वाढतो

तज्ज्ञांच्या मते, अशा पानांमध्ये असलेली तीव्र रसायने व तंबाखू मेंदूवर थेट परिणाम करतात. निर्णयक्षमता कमी होणे, स्मरणशक्तीवर परिणाम, मानसिक अस्वस्थता, चिडचिडेपणा ही लक्षणे दिसू लागतात. सततच्या सेवनामुळे तोंडाचा व घशाचा कर्करोग होण्याचा धोका प्रचंड वाढतो. किशोरवयीन मुलांच्या पचनसंस्थेवर आणि वाढीवरही विपरीत परिणाम होत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हे गंभीर लक्षण ठरत आहे.


शाळा-महाविद्यालय परिसरातच जास्त खप

दुर्दैवाची बाब म्हणजे, शाळा व महाविद्यालय परिसरात या पानाचा खप मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा आहे. आठवी ते दहावीतील विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवक मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या आहारी जात आहेत. शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असताना पालक मात्र मुलांच्या बदलत्या वागणुकीकडे आणि खिशातील पैशांच्या वाढत्या खर्चाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.


समाज आणि प्रशासनाची जबाबदारी

तरुणांचे वैयक्तिक आयुष्य, आरोग्य आणि करिअर धोक्यात येत असताना प्रशासनाने आणि समाजाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालयांनी जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना या व्यसनापासून दूर ठेवण्याचा ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. “कडक पान खाण्याच्या नादात मुले स्वतःचे आयुष्य अंधारात ढकलत आहेत. आज परिणाम जाणवत नसले, तरी उद्या हेच व्यसन जीवघेणे ठरू शकते,” अशी भीती व्यक्त होत आहे.


पालकांनी आणि शिक्षकांनी वेळीच सावध व्हा! 

आपल्या मुलाच्या तोंडाचा वास, दातांचा रंग, अचानक बदललेले वागणे आणि मित्रांची संगत याकडे लक्ष द्या. मुलं शाळेत किंवा क्लासला गेल्यावर नेमके काय करतात, यावर देखरेख ठेवा. ‌‘फुलचंद‌’च्या विळख्यातून आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी आजच पावले उचला  उद्या उशीर होऊ शकतो!


“उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा; शाळेतूनच व्यसनमुक्तीचे संस्कार द्या!”  डॉ. महादेव कोरसाळे

आज राज्यात आणि देशात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर शाळा हीच पहिली आणि प्रभावी संस्कारशाळा ठरली पाहिजे. मुलांना केवळ पुस्तकातील ज्ञान देऊन चालणार नाही, तर व्यसनाचे भयंकर परिणाम काय असतात हे ठोस आणि वास्तव उदाहरणांसह शिकवले गेले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका डॉ. महादेव कोरसाळे यांनी मांडली.

“व्यसनामुळे शरीराची हानी होते, मानसिक संतुलन बिघडते, कुटुंब उद्ध्वस्त होते आणि आर्थिक कंबरडे मोडते. तरीही समाज डोळेझाक करत आहे. आज अनेक तरुण सिगारेट, गुटखा, दारू आणि इतर घातक व्यसनांच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. ही केवळ वैयक्तिक नाही, तर सामाजिक आपत्ती आहे,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “आजारी पडल्यानंतर लाखो रुपये खर्च करून उपचार करण्यापेक्षा, आजारच होऊ नये यासाठी शाळेपासूनच मूल्यशिक्षण देणे गरजेचे आहे. व्यसनमुक्ती हा फक्त आरोग्य विभागाचा विषय नसून शिक्षण विभाग, पालक आणि समाज यांचीही तितकीच जबाबदारी आहे.”“जर आज आपण ठोस पावले उचलली नाहीत, तर उद्याची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाईल आणि समाजाची पायाभरणीच कमकुवत होईल. त्यामुळे शासनाने शालेय अभ्यासक्रमात व्यसनमुक्ती, आरोग्य-जागरूकता आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण सक्तीचे करावे,” अशी ठाम मागणीही त्यांनी केली.“उपचारापेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ” हे तत्व अंगीकारूनच आपण निरोगी आणि सक्षम पिढी घडवू शकतो, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

 
Top