कळंब (प्रतिनिधी)- जिथे कष्ट, श्रम व मनोभावनेने जिद्द बाळगून परिश्रम केले जाते. त्यालाच त्याचे फळ मिळते ते म्हणजे कळंबचे भूमिपुत्र गोकुळ आशा विष्णुदास भराडिया (वय 32) यांनी आपल्या जीवनप्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे. कोणताही शासकीय वारसा, राजकीय शिफारस किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ सेल्फ स्टडी,कठोर परिश्रम,जिद्द आणि चिकाटी या भांडवलावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्यांदाच प्रयत्नात 26 वी रँक मिळवत घवघवीत यश मिळवत सहाय्यक विक्रीकर आयुक्त (जी.एस.टी. विभाग),श्रेणी1 हे प्रतिष्ठेचे पद पटकावले आहे.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या गोकुळ भराडिया यांचा प्रवास सोपा नव्हता. वडील कळंब येथे आडत दुकान चालवत होते. मात्र तोट्यात गेल्याने ते बंद पडले. तरीही परिस्थितीपुढे हार न मानता गोकुळ यांनी शिक्षणालाच आपले अस्त्र बनवले. अभ्यासासाठी कोणतीही कोचिंग क्लासेसची मदत न घेता शहरातीलच सावित्रीबाई फुले विद्यालयात पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर राजश्री शाहू महाविद्यालयात अकरावी, बारावी शिक्षण घेतले. यानंतर पुणे येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे येथून बी.टेक (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) ही पदवी संपादन केली. नंतर त्यांनी 2020 साली एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 22 वी रँक मिळवून नायब तहसीलदार पदाची नियुक्ती मिळवली.
नायब तहसीलदार म्हणून सोलापूर येथे सेवा बजावल्यानंतर कळंब तहसील कार्यालय (जि. धाराशिव) येथे कार्यरत होते. प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळत असतानाच, मर्यादित वेळेत त्यांनी पुन्हा एकदा एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. शिस्तबद्ध वेळापत्रक आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा एमपीएससीमध्ये यश संपादन करत सहाय्यक आयुक्तपदापर्यंत मजल मारली. प्रशासकीय सेवेत असूनही समाजाभिमूख कार्याची तळमळ त्यांच्या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येते. गोकुळ भराडिया यांची यशोगाथा ग्रामीण भागातील असंख्य युवकांसाठी आशेचा किरण आणि प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.
