तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटगाव ते सोलापूर महामार्गावरील नुकत्याच पूर्ण झालेल्या डांबरीकरण कामाच्या दर्जाबाबत नागरिकांतून तीव्र शंका व्यक्त केली जात आहे. विशेषतः कॅनलवरील जुन्या पुलाखाली पाईप टाकून मजबुतीकरण करणे आवश्यक असताना ते काम न करता थेट डांबरीकरण करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या मते, संबंधित पुलाच्या ठिकाणी आवश्यक तांत्रिक कामे न केल्यास भविष्यात जड वाहने (लोडेड गाड्या) जाताना रस्ता खचण्याची शक्यता असून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे वाहन पलटी होऊन जीवितहानीची भीती व्यक्त होत आहे. या परिसरात यापूर्वीही विविध विकासकामांमध्ये ठेकेदारांकडून थातूरमातूर कामे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, रस्ते, नदी-नाले पूल आणि इतर कामांचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असल्याची भावना आहे.
काटगाव परिसर हा तालुका व जिल्ह्याच्या सीमेवरील भाग असल्याने येथील नागरिकांचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर सोलापूरशी संबंधित आहेत. त्यामुळे काटगावसोलापूर मार्ग हा दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीत रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. सदर रस्ता काम नुकतेच पूर्ण झाल्याचे समजते. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी, आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात व जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
