तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूरात येतात. पिंपरी चिंचवड येथील एका भाविकाच्या हातातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडली, आणि ती परत मिळणे अशक्य झाल्याची घटना घडली. 

सुमारे दोन महिन्यांपूर्वी हा भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आला होता. देवीसमोर दान अर्पण करताना त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडली. आपली चूक लक्षात येताच त्यांनी तात्काळ मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला. भाविकाने अंगठीचा फोटो, ती नेमकी कोणत्या दानपेटीत पडली याची अचूक माहिती देत रीतसर अर्जही केला. “माझी अंगठी  परत मिळावी,” अशी विनंतीही त्यांनी केली. मात्र, मंदिर संस्थानने भाविकाचा अर्ज  स्वीकारून त्या भाविकास नियमामुळे आपणाला आपली दानपेटीत पडलेले  ऐवज परत मिळू शकत नाही असे त्यांना कळवण्यात आले. या प्रकरणावर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार माया माने म्हणाल्या,“2017 साली नियम करण्यात आला आहे की एकदा दानपेटीत पडलेला ऐवज किंवा रक्कम काढता किंवा परत करता येणार नाही. तो नियम भाविकालाही कळवण्यात आला आहे.”


नियम का करण्यात आला?

मंदिर संस्थानने स्पष्ट केले की, यापूर्वी अशा घटनांचा गैरफायदा घेण्याचे प्रकार समोर आले होते. काही अपप्रवृत्तीचे लोक ‌‘चुकून पडले‌’ असा दावा करून दानपेटीतून मौल्यवान वस्तू काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. ही फसवणूक थांबवण्यासाठीच हा कठोर नियम करण्यात आला. तरी भाविकांनी पैसे, दागिने,  मौल्यवान वस्तू यांची विशेष काळजी घेण्याची विनंती मंदिर समितीने केली आहे.

 
Top